मुंबई - 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या आधीच भाजप प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश महाआघाडीस मोठा धक्का असणार आहे. अहमदनगरमधील सभेत १२ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत तर १७ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजप प्रवेश करणार आहेत.

राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची वाट पकडली . आता ते अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयानंतर विजयसिंह मोहित पाटीलही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे भाजप प्रवेश करण्याने माढा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असलेल्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा फायदा होणार आहे. 

 
Top