पंढरपूर (दिनेश खंडेलवाल )-सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या आधी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होता. यामध्ये मी निवडणूक लढविलेली आहे. माझी कर्मभूमी सोलापूर असल्यामुळे मला वडार समाजासह इतर समाजातून पाठींबा वाढत आहे. सध्या मी अपक्ष निवडणूक लढविल्यास सुमारे ५ ते ६ लाख मते मिळवू शकतो. मी यापूर्वी १९९९ साली लढविलेल्या निवडणूकीमध्ये अपक्ष असतानाही पंढरपूर शहर व तालुक्यातून ६३,५३७ एवढी मते मिळविली होती. तरीही संपूर्ण मतदारसंघातून सुमारे एक  लाख मते मिळाली होती यामुळे भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा निवडणूकीचे इच्छूक उमेदवार  दगडूशेठ घोडके यांनी ज्ञानप्रवाहशी बोलताना  व्यक्त केले.

  १९९९ साली पंढरपूर शहर व तालुक्यातून १ लाख ५७ हजार ४१० एवढे मतदान होते. यामध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना पक्षाची उमेदवारी असताना  ७६ हजार २५० मते, मला (दगडूशेठ घोडके) ६३ हजार ५३७ मते, संदिपान थोरात यांना १० हजार ८२७ मते, त्यावेळचे भाजपाचे उमेदवार नागनाथ क्षिरसागर यांना ६ हजार ३६९ मते व बहुजन समाज पार्टीचे डॉ.प्रितीश जळगांवकर यांना ४२७ मते मिळाली होती. यामध्ये मी अपक्ष असताना ही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविलेली आहे. यामुळे पक्षाने माझ्या म्हणण्याचा विचार करावा. 
  भाजपाचे विद्यमान खासदार ऍड.शरद बनसोडे यांनी दुसरे इच्छूक उमेदवार महास्वामी महाराज यांचा जातीचा दाखला बोगस असल्याचे जाहीरपणे सांगितलेले आहे. यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास पक्ष अडचणीत येवू शकतो व त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होवू शकतो याची पक्षाला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. मी यापूर्वी ४ वेळा निवडणूक लढविलेली आहे छाननीमध्येही माझा अर्ज मंजूर झालेला आहे. यामुळे माझा जातीचा दाखला खरा आहे. याचा विचार करून पक्षाने मलाच उमेदवारी द्यावी. माझ्या मतदारसंघातील सर्व  कार्यकर्ते व मतदारांच्या आग्रहामुळे मी २०१९ची लोकसभा निवडणूक लढविणार हे निश्चित आहे.
जर भाजपाने उमेदवारी दिली नाही तर यामुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान होवू शकते. तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी दगडूशेठ घोडके यांनी केलेली आहे यामुळे भाजपा आता काय निर्णय घेणार याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.
 
Top