सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते आपला उमेदवारी अर्ज दि. २५ मार्च रोजी दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांची कन्या आणि काॅगेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे.कासेगाव येथील एका सभेत बोलताना आमदार शिंदे यांनी मागील निवडणूकीतील अपयशाचे खापर मिडीयावर फोडले.
यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणूकीत सोशल मीडियाचा वापर करून खोटी आश्वासने दिली. खोट्या आश्वासनाला बळी पडून लोकांनी मोदीला निवडून दिले. गेल्या पाच वर्षांत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली. शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत.
अशा गोष्टीमुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. काँग्रेसनी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचत नाहीत. देशातील टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रे मोदीने विकत घेतली आहेत. अशी टिप्पणी करत त्यांनी थेट मिडीयावर निशाना साधला. त्याचबरोबर नव्याने व पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण मतदार युवकांना त्यांनी जागरूक राहून मतदान करण्याबाबत आव्हान केले. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश तात्या पाटील, जिल्हा युवकाचे अध्यक्ष नितीन नागणे, सेवा दलाचे अध्यक्ष नागेश फाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव तसेच गादेगाव या दोन ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेतल्या व मतदारांशी संपर्क साधला.