बिराटनगर, (नेपाळ) : चार वेळा जेतेपद मिळविणाऱया भारताच्या महिला फुटबॉल संघाने सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना बांगलादेशचा ४-० अशा गोल फरकाने धुव्वा उडविला. दलिमा छिब्बरने भारताचे खाते उघडल्यानंतर इंदुमती कथिरेसनने दोन गोल नोंदवले. त्यानंतर इंज्युरी टाईममध्ये मनीषाने आणखी एका गोलाची भर घालत विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताने तीन सामन्यात १५ गोल केले आहेत बांगलादेशच्या खेळाडूंनी शारीरिक ताकदीचा वापर करीत वेगवान खेळाच्या आधारे भारतीय बचाव फळीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताची सेंटरबॅक जोडी आशालता व स्वीटी देवी यांनी शानदार बचाव करीत त्यांचे प्रयत्न फोल ठरविले. भारताने पकड मिळविल्यावर१८ व्या मिनिटाला संजूने मारलेल्या फटकयावर दलिमाने अचूक फटका मारत पहिला गोल नोंदवला.  
२३ व्या मिनिटाला मिडफिल्डर इंदुमतीने भारताचा दुसरा गोल नोंदवला. यासाठीही तिला संजूनेच चेंडू पुरविला होता. ३७ व्या मिनिटाला प्रतिआक्रमणात भारताने तिसरा गोल नोंदवला. इंदुमतीचा हा दुसरा गोल होता. सामना संपण्याच्या सुमारास मनीषाने गोलरक्षिकेला हुलकावणी देत संघाचा चौथा गोल नोंदवला. भारताची अंतिम लढत शुक्रवारी यजमान नेपाळशी होणार आहे.
 
Top