मुंबई -लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार विद्यमान खासदारांना नारळ देण्यात आला आहे. त्यात अनिल शिरोळे (पुणे), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) ए.टी.नाना पाटील (जळगाव) आणि शरद बनसोडे (सोलापूर) यांचा समावेश आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली.पुण्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना भाजपाने उमेदवारी दिली. जळगावमध्ये स्मिता वाघ यांना, दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ.भारती पवार यांना तर सोलापुरातून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली. डॉ.भारती पवार या २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ या विधान परिषदेच्या सदस्य असून त्यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपाने आतापर्यंत सहा खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. त्यात दिलिप गांधी (अहमदनगर) आणि सुनील गायकवाड (लातूर) यांचाही समावेश आहे.

   काँग्रेसने पाच उमेदवार शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जाहीर केले. त्यात चंद्रपूर - विनायक बांगडे, जालना - विलास औताडे, औरंगाबाद - सुभाष झांबड, भिवंडी - माजी खासदार सुरेश टावरे आणि लातूर - मच्छिंद्र कामंत यांचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये संजय देवतळे, जालना - विलास औताडे भिवंडी - विश्वनाथ पाटील, औरंगाबाद - नितीन पाटील तर लातूरमध्ये दत्तात्रय बनसोडे हे काँग्रेसचे उमेदवार होते. या सहाही जागा काँग्रेसने गमावल्या होत्या.

पुणे येथील राज्यसभेचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काकडे यांचे व्याही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता काल पर्यंत कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची भाषा करणारे काकडे  मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर उपस्थित राहत आहेत.

 
Top