पंढरपूर दि.१६:-  दिवसें-दिवस टंचाईची तीव्रता वाढत आहे. ज्या ठिकाणी टँकर व चाऱ्याची आवश्यकता आहे, अशा गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव व चारा मागणीचे अर्ज त्वरित प्रशासनास द्यावेत, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज माळशिरस तालुक्याच्या टंचाई आढावा बैठकीत दिल्या.

    माळशिरस येथील अर्चना मंगल कार्यालयात तालुक्याची टंचाई आढावा बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व संबंधित विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

 पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, टंचाई काळात जनतेला पाणी, रोजगार व चारा उपलब्ध करून देण्यास  राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. ज्या  गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल त्या गावांनी टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाची तातडीने तपासणी करून २४ तासात टँकर उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

माळशिरस तालुक्यातील २३ गावांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. दहा गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव  आले असून पाच गावात टँकर सुरु केले. आहेत. कोथळे व पठाणवस्ती येथे दोन दिवसात टँकर सुरु केला जाईल.तालुक्यात तीन लाख ३२ हजारावर मजूर क्षमतेची सुमारे ६७०० रोजगार हमी योजनेची  कामे मंजूर असून १८२ कामे सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी सांगितले.

 
Top