पंढरपूर । प्रतिनिधी,- सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर होवून तीन महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची शासकीय पातळीवरून उपाय योजना न केल्यामुळे शेतकरी, कामगार व पशुपालक अडचणीत आलेले आहेत. या मागणीसाठी पंढरपूर- कराड रोडवर सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन हे सुमारे २ तास सुरू होते. यामुळे या मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. 

आंदोलनस्थळी नायब तहसिलदार हे निवेदन स्विकारण्यासाठी आले होते मात्र आंदोलनकर्त्यांनी तहसिलदार जोपर्यंत येत नाहीत व प्रशासनाची भूमिका जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका नागणे यांनी घेतल्यामुळे या ठिकाणी तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना यावे लागले व त्यांनी निवेदन स्विकारले.  त्यानंतर त्यांनी प्रशासनाच्यावतीने तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, द्रोणाचार्य हाके, ता.कार्याध्यक्ष मिलिंद भोसले, सलीम मुलाणी, बशीर मुलाणी, बंडू येडगे, सादिक मुलाणी, भारत पवार, संदिप शिंदे, नितीन शिंदे,सोमनाथ आरे, कृष्णा कवडे, अनिकेत देशमुख, सौदागर क्षिरसागर, सोमनाथ नागटिळक, हणमंत देठे, भास्कर गायकवाड, आकाश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शनिवार दि.९ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने छारा छावणी चालू करावी किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावेत, मागेल त्या गावाला पिण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करावा, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावीत, दुष्काळी फळबाग अनुदान तात्काळ द्यावे, दुधाचे दर वाढवून अनुदान द्यावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यानंतर ही शासनाने वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिला.

 
Top