पंढरपूर(प्रतिनिधी)- जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून संभाव्य चारा टंचाईचे नियोजन शासनातर्फे करण्यात येत आहे .येत्या चार महिन्यात चारा व पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने जनावरांसाठी आवश्यक असणारी वैरण, चारा, पाणी याबाबत सुयोग्य नियोजन करून शासनाने चारा छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे .शासनाकडून मोठ्या जनावरांसाठी रु७०/-  व लहान जनावरांसाठी रु ३५/- प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु सध्याची शेतकऱ्यांची अवस्था पाहता चारा वाहतूक करण्यासाठी वाहतुकीचा खर्च, टँकरचा खर्च इतक्या अल्प अनुदानात पुरविणे शक्य होणार नाही. या सर्व अडचणी पालकमंत्री विजय देशमुख व आ. प्रशांत परिचारक यांच्या दुष्काळ दौऱ्यात चारा छावणी चालकांनी मांडल्या होत्या . याबाबत सुयोग्य नियोजन करण्यासाठी प्रति मोठे जनावर रु१००/-व प्रति लहान जनावर रु५०/- अनुदान द्यावे अशी मागणी महसूल व कृषिमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचेकडे आ. प्रशांत परिचारक यांनी केली आहे. महाराष्ट्रातील १५१ हून अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.पावसाअभावी निर्माण झालेल्या चारा छावण्या उभारणी साठी शेतकरी,संस्था यांना अनुदान देण्यात येईल याबाबत ना.पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.याबाबत ना.चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.    
 
Top