अलिबाग,(जयपाल पाटील ) - रायगड पोलिस दलात बांगला देश विशेष पथकात १६ गुन्हे दाखल करुन ४१ गुन्हेगारांना बांगलादेशात पाठवून ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर नुकताच पोलिस सब इन्स्पेक्टर प्रल्हाद माने सेवानिवृत्त झाल्याने रायगड पोलिस उपअधिक्षक गृह विजय पांढरपट्टे यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. 

माने यांचे वडील भारतीय सैन्यात १९६२ साली शहीद झाले. त्यांची पाच भावंडे आई इंदुबाई रामचंद्र माने यांनी वाढविली. त्यांनी महाड तालुक्यातील किंजळोली दावेकर गावापासून १० कि.मी. पायी महाडमध्ये येवून सातवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर एसएससी पर्यंत मिलीटरी हॉस्टेलमध्ये शिक्षण घेवून १९८३ साली पोलिस दलात भरती होवून अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. 

  त्यानंतर पेण, वडखळ, अलिबाग क्राईम ब्राँचमध्ये असताना २०१३ साली पोलिस सब इन्स्पेक्टर झाले. त्यांना आतापर्यंत १७५ पुरस्कार प्राप्त झाले. तर २०१८ ला पोलिस महासंचालकांचे उत्कृष्ट सेवा पदक मिळाले. त्याबद्दल रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी प्रमाणपत्र देवून त्यांचे कौतुक केले. त्यांना तिन मुली असून पैकी एक गृहिणी, डॉक्टर, तिसरी मॅकेनिकल इंजिनिअर असून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विजया प्रफुल्ल माने या रायगड पोलिस दलात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी कार्यरत आहेत. 

निवृत्तीनंतर पोलिसांच्या मुलांना अधिकारी होण्याचे मार्गदर्शन करणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

 
Top