बीड -राज्यभर गाजलेल्या परळी येथील स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी सरस्वती मुंडे आणि पीडितेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. डॉ. मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. याप्रकरणात न्यायालयाने ११ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.  

   बीड जिल्ह्यातील परळी येथील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणात शुक्रवारी जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्या.ए. एस. गांधी यांनी तिघांना दोषी ठरवून १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.तिघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षाही दिली आहे. मुंडे याच्या रुग्णालयात २०१२मध्ये एका महिलेची गर्भ लिंगनिदान चाचणी करण्यात आली असता पोटातील बाळ मुलगी असल्याची स्पष्ट झाले. त्यावेळी डॉक्टरने कुठलाही दस्ताऐवज न ठेवता गर्भपात केला व त्यातच त्या महिलेचा मृत्यूझाला. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. पोलिसांनी परळी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध तसेच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास केला असताडॉ. सुदाम मुंडे याने याआधीही अनेक गर्भपात करून ती अर्भके प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून स्वत:च्या शेतातील पडक्या विहीरीत टाकल्याचे समोर आले होते.

 
Top