श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने शहरातील रस्ते साफसफाईचा ठेका देवू नये,सदर कामासाठी खर्च करण्यात येणार्‍या रकमेचा विनियोग मंदीर समितीने बाह्य रुग्ण विभाग सुरु करुन तज्ञ डॉक्टरांची भाविकांची व स्थानिक नागरिकांची सोय करावी,त्याच बरोबर शहरात येणार्‍या भाविकांना मार्गदर्शन करणार्‍या गाईडना प्रशिक्षीत करुन ओळखपत्रे द्यावीत अशा आशयाची मागणी समस्त महादेव कोळी समाज संघाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

   या बाबत अधिक माहीती देताना संघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर म्हणाले की, गतवर्षी एप्रिल महिन्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने शहरातील प्रदक्षीणा मार्गासह विविध रस्ते स्वच्छ करण्याचे काम ठेकेदारास दिले होते.यासाठी मंदीर समितीने जवळपास दिड कोटी रुपये इतकी रक्कम खर्च केली आहे.वास्तविक पाहता याच सुविधा भाविकांना नगर पालीकेद्वारे ऊपलब्ध करुन देता याव्यात म्हणून शासन नगर पालीकेस 5 कोटी यात्रा अनुदानासह विविध प्रकारे अर्थिक मदत करते.असे असताना मंदीर समितीचे वार्षिक उत्पन्न पाहता एवढी मोठी रक्कम या कामावर खर्च करणे अनाठायी आहे. या ऐवजी मंदीर समितीने या वर्षी हा ठेका न देता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने बाह्य रुग्ण विभाग(ओपीडी) सुरु करावी याचा लाभ भाविकांना व शहरातील नागरिकांना होईल.त्याच बरोबर शहरात देशभरातून मोठया संख्येने भाविक येत असतात.या भाविकांना शहरात आल्यानंतर येथील प्रत्येक धार्मिक स्थळांची माहीती देण्यासाठी व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गाईड म्हणून कार्यरत असलेल्या बेरोजगार युवकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे,इतर प्रादेशिक भाषांची तोंडओळख करुन द्यावी.त्यांना ओळखपत्रे देण्यात यावीत अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे समितीकडे केली आहे.समितीने याची दखल न घेतल्यास संघाच्या वतीने नामदेव पायरी येथे धरणे आंदोलन करण्यात येईल.

  हे निवेदन देताना समस्त महादेव कोळी समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप माने, जिल्हाध्यक्ष सुनिल अधटराव,कृष्णा नेहतराव,अदित्य माने,आप्पा करकमकर आदी उपस्थित होते. 

 
Top