पंढरपूर/ दिनेश खंडेलवाल -रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने पाॅश मशीनद्वारे मालाचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे.हे वितरण करीत असताना रास्तधान्य दुकानदार या मशीनवर अंगठयाचा ठसा उमटविण्यास सांगतात. सध्या ग्राहकांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ठशांची सत्यापन करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेसाठी दुकानदारांना ठराविक मुदत दिली आहे. परंतु याच कारणावरून गावागावात रास्तधान्य  दुकानदार आणि ग्राहकांमध्ये खटके उडून प्रसंगी हातापाई होताना दिसत आहे. असाच एक प्रसंग पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे घडला आहे. या गावातील रास्तधान्य दुकानदार महादेव मारुती देठे यांच्या दुकानात याच गावातील ग्राहक विठ्ठल उत्तरेश्वर खपाले हे आपली पत्नी आणी  मुलीस घेऊन माल घेण्यासाठी आले होते. दुकानात अंगठ्याच्या ठशांच्या सत्यापणाचे काम सुरू होते. प्रत्येक ग्राहकाचे सत्यापन करून तेथे हे ग्राहकास माल देत होते. खपाले यांचा आणि त्यांच्या पत्नीच्या अंगठ्याच्या ठशांचे सत्यापन करून घेतले गेले परंतु मुलींच्या ठशांचे सत्यापन होण्यात अडथळा येत गेला. यावरून विठ्ठल खपाले हा ग्राहक चिडला आणि बाचाबाची सुरू झाली. बघता बघता खपाले यांनी या दुकानातील पॉश मशीन उचलून फरशीवर आपटली . रास्तधान्य  दुकानदारास फरशीवर आपटून मारहाण करण्यात आली. या बाचाबाचीत या दुकानातील एक खुर्ची मोडून दुकानातील धान्य विस्कटले गेले आणि बघता बघता या भांडणातून सारा गाव गोळा झाला. रेशन वितरण करताना झालेल्या या प्रकाराबाबत रास्तधान्य दुकानदार जालिंदर देठे यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. घडल्या प्रकाराची माहिती तालुका पुरवठा निरीक्षक यांना दिल्याने निरीक्षक इंगोले यांनी याबाबतचा पंचनामा घटनास्काथळी दुकानावर जाऊन केला आहे. परंतु अंगठयाच्या ठशाचे सत्यापन करण्यात येणाऱ्या असंख्य अडचणींमुळे गावागावातील रास्तधान्य दुकानदार व्यथित आहेत. काही ग्राहकांचे अंगठ्यांचे ठसे कष्टाच्या कामामुळे उमटवण्यात दुकानदारांना असंख्य अडचणी येत आहेत. यामुळे असे भांडणाचे प्रकार गावोगावी घडत आहेत. परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शासन कोणती उपाययोजना करणार याकडे रास्तधान्य दुकानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. यासाठी शासनाने योग्य तो मार्ग काढून ग्राहकांची सोय करावी अशी मागणी होत आहे. तर ग्राहकांनी सुध्दा दुकानदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करावा असे तालुका पुरवठा निरीक्षक इंगोले यांनी सांगितले. 
 
Top