राज्याचे मुख्यमंत्री सतत अभ्यास करतात ,परिक्षा माञ जनतेला द्यावी लागते

 लातूर,अहप्रतिनिधी- राज्यातील प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री सतत अभ्यास करतात परीक्षेला मात्र जनतेला सामोरे जावे लागते आहे अशी उपरोधक टिका अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अहमदपूर येथे शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या विराट मोर्चानंतर आयोजित जाहीर सभेत बोलतांना केली.

  शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी मिळावी, वीजबिल माफ व्हावे,शेतकऱ्याच्या मुलांना शैक्षणीक फी माफी द्यावी,निराधारांचे मासिक मानधनात वाढ करावी, सुशिक्षित बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता द्यावा, वन्य प्राण्याकडून शेतीपिकाची नासधूस झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, दुष्काळी अनुदान हेक्टरी ५० हजार दिले जावे यासह शेतकरी, शेतमजूर, निराधार, सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय मागण्यांसाठी आज १८ फेब्रुवारी रोजी माजी राज्यमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.गणेश कदम यांच्या पुढाकारातून विराट मोर्चा काढण्यात आला होता.

  अहमदपूर येथील थोडगा रोड येथून निघालेल्या विराट मोर्चाची सांगता तहसील कार्यालय अहमदपूर येथे जाहीर सभेने झाली. यावेळी पूढे बोलतांना आमदार देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा संदेश घेऊन मी आज येथे आलो आहे.सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही संघर्षाची भूमीका घ्यायची ठरवली आहे. केवळ आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारचे १५ लाख जनतेला मिळाले नाहीत, विदेशातून काळा पैसाही आलेला नाही, स्वामीनाथन आयोगही लागू झालेला नाही, २ कोटी नौकऱ्या तर मिळाल्या नाहीतच परंतू नोटा बंदीमुळे आहे तो रोजगार बुडाला आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आता या सरकारने शेतकऱ्यांना दररोज १७ रूपये देऊ केलेले आहेत. यासाठी बऱ्याच अटी आहेत. यातून जनतेला मदत होण्याऐवजी त्यांची चेष्टाच होत आहे. वास्तविक पाहता शासनाची ही मदत म्हणजे आगामी निवडणुकीत मतांची लुट करण्यासाठी या शासनाकडून अमिषच दाखवले जात आहे. त्यामुळे आम्हाला भिक नको आम्हाला आमचा हक्क हवा असे या राज्यकर्त्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे .लोकनेते विलासराव देशमुख यांनी अहमदपूरसाठी भरपुर काही केले आहे. आगामी काळातही येथील विकास प्रक्रीयेला गती दयायची आहे. त्यासाठी यावेळी अहमदपूरकरांनीही काँग्रेसला साथ द्यायला हवी. लातूरचा खासदारही काँग्रेसचाच आणि अहमदपूरचा आमदारही काँग्रेसचाच निवडूण द्या मग अहमदपूरच्या विकासाला किती गती येते हे बघा असेही आमदार देशमुख यांनी यावेळी म्हटले.

अहमदपूर, चाकूर या तालुक्यांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही याची जाणीव येथील जनतेला झाली आहे. त्यामुळेच आम्ही आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्व स्विकारले आहे. या तालुक्यातील अंधाधुंद कारभार मोडीत काढण्याचा निर्धार येथील युवा वर्गाने केला आहे. या मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही आमदार देशमुख यांना साकडे घातले आहे. ते येथील प्रश्न विधानसभेत लावून धरतील व ती सोडवतील असा विश्वास डॉ. गणेश कदम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

यावेळी ॲड.विक्रम हिप्परकर, हेमंत पाटील, अण्णासाहेब पाटील, विकास महाजन, चंद्रकांत मुद्दे, भारत रेड्डी, यांची उपस्थिती होती तर सिराजुद्दीन जहागीरदार,निलेश देशमुख (ता.NSUI अध्यक्ष), एजाज सय्यद(ता.अध्यक्ष-काँग्रेस अल्पसंख्याक सेल), निलेश देशमुख (युवक काँग्रेस अध्यक्ष, अहमदपूर विधानसभा मतदार संघ), राजकुमार सस्थापूरे(शेतकरी संघटना) यांनी आपल्या भाषणात सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्लाबोल केला. या जाहीर सभेचे प्रास्ताविक डॉ.गणेश कदम यांनी केले तर आभार श्रीमती लताताई चांदसुरे यांनी मानले. जाहीर सभेपूर्वी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 
Top