पुणे :गेल्या आठवडय़ापासून राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली होती. बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला होता. कमाल तापमानातही वाढ झाल्याने हवेतील गारवा नाहीसा होऊन उकाडा जाणवू लागला होता. उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे जाणवत असतानाच गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात घट होऊ लागल्याने संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवतो आहे  . उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत खाली गेल्याने रात्री आणि पहाटे पुन्हा गारवा जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात चढ-उतार होणार आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे २ मार्चला विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
Top