उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर सर्वात मोठा हल्ला पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपुरा भागातील गोरीपोरा येथे  झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

   प्राथमिक माहितीनुसार, सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात दोन हजारांहून अधिक जवानांचा समावेश होता. या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते. जखमींना तत्काळ श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते; पण १८ जवान वाटेतच हुतात्मा झाले. उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
  जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपुरा येथे पाठवण्यात आले आहे. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे समजते. तत्पूर्वी जैश-ए- मोहम्मदने स्थानिक वृत्तवाहिन्यांना मेसेज करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. आयईडी स्फोटके गाडीत ठेवण्यात आल्याची कबुलीही त्यांनी दिली. अदिल अहमद याने हा आत्मघातकी स्फोट घडवून आणला. अदिल हा पुलवामाच्या गुंडी बाग येथील रहिवासी होता.

   जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी असलेल्या अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. 

या घटनेनंतर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी त्यांचा संताप ट्विट द्वारे व्यक्त केला आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला आम्ही घेऊ .मी त्या शहीद जवानांच्या शौर्याला नमन करतो,असे सिंह यांनी म्हटले आहे.

 
Top