मतांचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्या सोबत यावं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. मनसेला राष्ट्रवादीने सोबत येण्याची ऑफरच दिली आहे असंच या वक्तव्यावरून दिसतं आहे. आता राज ठाकरे या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एवढंच नाही तर राजू शेट्टींचे मतभेदही दूर करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. खरंतर आपण हे पाहिलं की राज ठाकरे हे कायमच अजित पवारांवर टीका करताना त्यांची नक्कल करताना दिसले आहेत. मात्र येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या असणार आहेत असेच दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेटी घेताना दिसत आहेत. छगन भुजबळ यांनीही कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे राष्ट्रवादी एकत्र येणार का? या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. आता अजित पवारांनीच मनसेला सोबत येण्यासाठी हात पुढे केला आहे. भाजपा विरोधात लढायचं असेल तर सेक्युलर विचार मानणाऱ्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. तसेच मनसे सोबत आल्यास मतांचं विभाजन टळेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात वाद-प्रतिवाद होत असतात. निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्यात रंगलेला कलगीतुराही आपण पाहिला आहे. अशात आता राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन अजितदादांनी केलं आहे. हे जर राज ठाकरेंनी स्वीकारलं तर निवडणुकांच्या तोंडावर वेगळी समीकरणं पाहण्यास मिळतील यात शंका नाही. काँग्रेसला मनसेने आघाडीसोबत यावं हे मान्य नाही, तरीही अजित पवारांनी ही ऑफर दिली आहे. आता या ऑफरचा विचार राज ठाकरे करणार का? राष्ट्रवादीसोबत जाणार का? राजा आघाडीला साथ देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
Top