नवी दिल्ली - भारतीय वायूसेनेने पाकिस्तान मध्ये घुसून तेथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्याच्या वृत्ताला भारत सरकारकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. 

त्यानंतर, काही तासांतच गुजरातमधील कच्छ प्रांतात पाकिस्तानचे एक ड्रोन फिरताना आढळून आले. मात्र, भारताकडून पाकचे हे ड्रोनही नेस्तनाबूत करण्यात आले आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील सीमा भागांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय वायू सेनेकडून मध्यरात्री ३.३० वाजता बालाकोट येथील दहशतवादी तळांवर मिराज आणि सुखोई या विमानांच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावून या हल्ल्यासंदर्भात चर्चा सुरू केली तर, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून का आणि कुठे हल्ला केला, याची माहिती दिली आहे .पाकिस्तानमधील संघटना जैश ए मोहमद हे भारतीय सैन्यावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच भारतीय सैन्याने हल्ला घडवून त्यांच कंबरड मोडलं आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी, कमांडर, ट्रेनी दहशतवाद्यांचा खात्मा केला मात्र, नागरिकांना कुठलाही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय संरक्षण खात्याने सीमारेषेवर हाय अलर्ट जारी केला असून नालिया एअर बेसजवळ हा पाकिस्तानी ड्रोन आढळून आला होता. भारतीय सैन्याने क्षणार्धातच हा ड्रोन नष्ट केला आहे. नालिया हे भारतीय वायू सैन्याचे अत्याधुनिक एअर बेस असून आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या अगदी जवळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ६.३० वाजता हा पाकिस्तानी ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आला आहे.

 
Top