राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अखेर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रंह आम्ही त्यांच्याकडे केला. आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागावाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी, पक्षाच्या वाट्याला येणारे मतदारसंघ, काही जागांबाबत निर्माण झालेला पेच, इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली. माढा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली होती. ‘शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला. आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील’, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक संपली. महत्त्वाच्या उमेदवारांची नावे निश्चित. अंतिम घोषणा लवकरच. राज्यात महाआघाडी लोकसभेच्या ३५ जागा जिंकणार, असा दावाही त्यांनी केला. धर्मनिरपेक्षवादी भूमिका असणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. महाआघाडीचा मसुदा काय असावा, याबाबतही चर्चा करण्यात आली, अशी माहिती अजित पवार यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत मनसेला सोबत घेण्यास सहमती झाली, असेही त्यांनी सांगितले.या बैठकीत संभाव्य उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी निश्चित झाली आहे. अन्य घटकपक्षांशी चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आघाडीच्या अंतिम उमेदवारांची यादी चार ते सहा दिवसांत जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 
Top