नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेतून भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या दबावापुढे अखेर पाकिस्तान झुकलं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली.संसदेत इम्रान खान म्हणाले की, ''शांतीचा संदेश देताना आम्ही भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका करु." इम्रान खान यांच्या या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. त्यामुळे उद्या अभिनंदन वर्धमान यांची सुटका होऊन तेे भारतात परतणार आहेत. 

  पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी २७ फेब्रुवारीला हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या कारवाईत वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. हा वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. 

यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. तणाव कमी करण्यासाठी आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं पाकिस्तानने म्हटलं होतं तर कोणत्याही वाटाघाटीशिवाय आमच्या वैमानिकाला भारतात सुरक्षित पाठवा, असं भारताने ठणकावलं होतं.

 
Top