पुलवामा येथील लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे. कराची आर्ट काॅन्सिलकडून जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कराची साहित्य महोत्सवाचं आमंत्रण आलं होतं. दोघांनीही हे आमंत्रण स्वीकारलं होतं. यासाठी दोन दिवसांचा कराची दौरा दोघंही करणार होते. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत या दोघांनीही पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम २३ आणि २४ फेब्रुवारीला होणार आहे .जावेद अख्तर यांनी ट्विट करत कराची साहित्य महोत्सवात जाण्याचा निर्णय रद्द केल्याची माहितीदिली आहे. ‘सीआरपीएफ जवानांविषयी माझ्या मनात आदर आहे. मी त्यांच्यासाठी एकदा गाणंही लिहिलं होतं. काही सीआरपीएफ जवानांना मी प्रत्यक्षातही भेटलो आहे त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.’ असं लिहित पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.  तर शबाना आझमी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे.

 
Top