लोकसभेच्या निवडणूक जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे राजकारण सुरू केलं आहे. भाजपचा मध्यमवर्ग हा कायम पाठिराखा तर शेतकरी वर्गही गेल्या काही दिवसांपासून नाराज होता.  या नाराजीचा लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसू शकतो, हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर हंगामी अर्थसंकल्पात मध्यमवर्ग आणि शेतकर्‍यांवर सवलतींचा वर्षाव केला. शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. 22 पिकांचे हमीभाव वाढविण्यात आले. गोरक्षणासाठी तरतूद करण्यात आली. मध्यमवर्गाला अडीच लाख रुपयांऐवजी पाच लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपच्या घोषणा आणि त्यांच्या निर्णयांना तितक्याच तोडीचं उत्तर द्यायला हवं, असं विरोधी पक्षाच्या लक्षात आल्यामुळे काँग्रेसही या घोषणाबाजीत मागं राहिलेली नाही. च्या अशा सवलतींच्या घोषणामुळं देशाच्या तिजोरीचं काय होईल, याची चिंता सत्ताधारी आणि विरोधी पक्षां पैकी कुणालाही नाही. गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देतानाच देशभरातील शेतकर्‍यांना सत्तेवर आल्यास कर्जमाफीचं आश्‍वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले . राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील निवडणुकांत कर्जमाफीच्या आश्‍वासनामुळं काँग्रेसला मोठा फायदा झाला. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीही कर्जमाफीचं आश्‍वासन काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मोदी यांनी अर्थसंकल्पात पाच एकरपर्यंत जमीन असणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवसांतच काँग्रेसनं देशभरात कर्जमाफी करण्याचं आश्‍वासन दिलं. शेतकर्‍यांची कर्जमाफी व तरुणांना रोजगार यावर पक्षाचा सर्वोच्च भर असेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 
 भाजप असो, की काँग्रेस; एवढ्या घोषणा करताना पैसे कुठून आणणार, हे मात्र सांगत नाहीत. काँग्रेसनं शेतकर्‍यांच्या केलेल्या कर्जमाफीची मोदी यांनी पश्‍चिम बंगालमधील सभांत खिल्ली उडविली. शेतकर्‍यांवर सुमारे १२ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. अर्थसंकल्पाच्या ४० टक्के ही रक्कम होते. असं असताना कर्जमाफी कशी करणार, हा प्रश्‍न पडतो. देशात शेतकर्‍यांइतकाच बेरोजगारांचा प्रश्‍न मोठा आहे. बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक झाला आहे. केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं, तर गरिबांना किमान वेतनाची हमी देण्यात येईल असं ते म्हणाले. प्रत्येकाच्या बँक खात्यात ती रक्कम जमा होईल असं आश्‍वासनही त्यांनी दिलं. नेत्यांच्या या खेळात तिजोरीची आणि वित्तीय शिस्तीची वाट लागते, हे भाजपा असो, की काँग्रेस कुणाच्याच लक्षात येत नाहीये.
 
Top