* सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्धार 

पंढरपूर , (प्रतिनिधी)- पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते दगडूशेठ घोडके हे लोकसभा निवडणूक लढविणार असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपली उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की  चहावाला  देशाचा पंतप्रधान होऊ शकतो  तर माझ्यासारख्या सामान्य  दगडफोड्या  खासदार का होऊ शकत नाही  असा मुद्दा उपस्थित करत  माजी केंद्रीय मंत्री  सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्यासाठी  सोलापूरची जागा सोडावी अन्यथा आपण त्यांना हरवणार आहोत अशी प्रतिक्रिया सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे  इच्छुक उमेदवार  दगडूशेठ घोडके यांनी  दिली. या निवडणुकीबाबत आपण अनेक पक्षांच्या संपर्कात असल्याचे ही  सांगितले. १९९९ साली पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सुमारे एक लाख मते मिळविलेल्या घोडके यांच्या सोलापूर मतदार संघातील उमेदवारीच्या या दाव्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडण्याची चिन्हे आहे. 
दगडूशेठ घोडके हे पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष असून  तीस वर्षापासून नगरसेवक होते. पंढरपूर शहराच्या राजकारणात १९८५ पासून सक्रिय असलेल्या घोडके यांचा अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडीत मोठा वाटा राहिला आहे.  सोलापूर मतदार संघात वडार समाजाची सुमारे अडीच लाख मतदार आहेत. दगडूशेठ घोडके यांचा या मतदारसंघातील त्यांच्या समाजाशी कायम संपर्क आहे. बांधकाम व्यावसायिक असल्याने तसेच चाळीस वर्षापासून ते उद्योगपती म्हणून वडार समाजात प्रसिद्ध आहेत.1999 साली लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर वीस वर्षे राजकारणापासून दूर असणारे घोडके यांनी अचानक हा निर्णय घेतल्याने या निर्णयाच्या पाठीमागे कुठल्या राजकीय पक्षाचा हात आहे की काय ? याबाबत तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात असणाऱ्या त्यांच्या समाजाच्या अडीच लाख मतांवर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यांच्या उमेदवारीचा फटका कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला बसणार याबाबत ही तर्कवितर्क लढविले जात आहेत. या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी सह काँग्रेस पक्षामध्ये दगडूशेठ घोडके यांच्या उमेदवारीमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Top