पंढरपूर:-(दिनेश खंडेलवाल ) - पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील एका हातभट्टी गुत्त्यावर छापा टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली तर गुळ मिश्रित रसायनासह सुमारे ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली असून या घटनेमुळे अवैध दारू विक्री त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील पारधी वस्तीवर ओढ्याच्या काठावर हातभट्टी दारू निर्माण करण्यात येत असल्याची माहिती पंढरपूर पोलिसांना मिळाली होती.  बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि त्यांच्या ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. देगाव येथील ओढ्याच्या काठावर असणाऱ्या या हातभट्टी गुत्त्यावर असणारे बिभीषण शामराव पवार आणि नामदेव अशोक काळे या दोघांना रंगेहात पकडून येथे असलेला ३००० लिटर गुळ मिश्रित सायनाचा साठा आणि ११ प्लास्टिक आणि लोखंडी बॅरल जप्त केले आहेत  एकंदरीत या छाप्यामध्ये ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  या घटनेतील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांचेवर भा. द. वि. कलम ६५ फ.प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकामध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोलीस कर्मचारी गणेश शिंदे, प्रकाश कोष्टी, पंढरीनाथ आरकीले यांचा सहभाग होता.

पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील ओढ्यालगत असणारी अवैध दारू भट्टी अनेक दिवसांपासून सुरू असून सहा महिन्यांपूर्वी याचा  दारु भट्टीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली परंतु या ठिकाणी अवैद्य दारू तयार करण्याचे काम अविरतपणे सुरू असल्याचे बुधवारी झालेल्या पोलीस कारवाईतून दिसत आहे. यावरून पंढरपूर तालुका पोलिसांचा अवैध धंदे करणाऱ्यांवर किती धाक आहे. हे या घटनेवरून दिसत आहे.

 
Top