पंढरपूर:-(दिनेश खंडेलवाल)भूवैकुंठ पंढरी नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या माघी वारीसाठी  राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक दाखल होत आहेत. पंढरपुर येथे  वर्षातून चार मोठ्या यात्रा भरत असतात. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यापैकी माघी एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली असून सध्या पंढरीत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.
उद्या शनिवार दि.१६ फेब्रुवारी रोजी माघी एकादशीचा मुख्य दिवस आहे  . कर्नाटक, सीमावर्ती भाग, कोकण, कोल्हापूर सिंधुदुर्ग व मराठवाडा सोलापूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी भाविक  वारीसाठी मोठ्या संख्येने येत असतात. शनिवारी होणाऱ्या माघी वारी सोहळ्यासाठी हजारो वारकरी भाविक दिंडीतून  पाई चालत  पंढरीच्या वाटेवर येत आहेत. 
पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवा सुविधेसाठी मंदिर समितीने चंद्रभागेच्या वाळवंटात चेंजिंग रूम तसेच भाविकांना दर्शनासाठी गोपाळपूर रोड वरील पत्रा शेड येथे निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची सोय, एकादशी दिवशी फराळाचे वाटप अशी सुविधा देण्यात येणार आहे. तसेच पंढरपूर  नगरपालिके कडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून  चंद्रभागेच्या वाळवंटात तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त हा गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. मंदिर परीसर, वाळवंट, प्रदक्षणा मार्ग, भक्तिमार्ग, ६५म  एकर, बसस्थानक, रेल्वे स्थानक, याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.
पंढरी नगरीत येणाऱ्या भाविकांसाठी येथील व्यापाऱ्यांनी कुंकू, बुक्का अष्टगंध व प्रासादिक भांडार, वारकऱ्यांना लागणारे टाळ, मृदुंग, पकवाज,डफ,चिपळी आदी वस्तूंची दुकाने थाटली असून भाविक खरेदीसाठी मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
 
Top