मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांची दादरमध्ये भेट झाली आहे. मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था असतानाच अजित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.कालच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत भाजपा विरोधा तील मतांची धुव्रीकरण टाळण्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज मुंबईत अजित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राष्ट्रवादी आणि मनसे यांची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला आघाडीबरोबर घेण्यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवार म्हणाले होते की, ''प्रत्येक राजकीय पक्षाचा एक ठरावीक मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी लाख, दीड लाख मते घेतल्याचे समोर आले होते. मनसे संदर्भात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि काँग्रेसची मतभिन्नता असली तरी येत्या निवडणुकीत मोदी सरकार विरोधातील मतविभाजन टाळण्या साठी ,भाजपाचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यामुळेच मनसेनंही आघाडीबरोबर यायला हवं, असं वाटत असल्याचंही अजित पवार म्हणाले होते. या महाआघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'इंजिन' जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेले काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना तीन जागांचा प्रस्ताव दिल्याचंही बोललं जात होतं. राज ठाकरे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. परंतु निवडणूक समझोत्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा झालेली नाही आणि ती होईल असं दिसतही नाही, असा खुलासा शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला होता. ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी या तीन जागा मनसेसाठी सोडल्यास महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी शरद पवारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. अलीकडच्या काळात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राष्ट्रवादीच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाऊ शकतात, अशी कुजबूजही ऐकू येत होती. अगदीच तीन नाही, पण दोन जागा मनसेला देऊन शरद पवार नवा मित्र जोडतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु आघाडीत मनसे नको, अशी काँग्रेसची भूमिका होती. ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि अन्य नेते ती ठामपणे मांडत होते.


 
Top