पंढरपूरमध्ये ‘पंढरी सायकल मॅरेथॉन’ उत्साहात संपन्न...

पंढरपूर (प्रतिनिधी):- आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशनस् सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरात ‘पंढरी सायकल मॅरेथॉन’ उत्साहात संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन या मॅरेथॉन चा शुभारंभ पंढरपूर मर्चंट बॅकेचे चेअरमन नागेश भोसले यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. त्यावेळी बोलताना ,नियमित सायकलींग करणे ही काळाची गरज बनली आहे. आजकालच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहोत. सायकल चालविणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजले जात आहे. परंतु तुम्हाला तुमचे शरीर जर सर्वार्थाने तंदुरुस्त ठेवायचे असेल तर सायकलींग करण्यासारखा योग्य व सोपा असा दुसरा कोणताच व्यायाम नाही. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा संतुलित व्यायाम सायकल चालवल्याने होतो, असे प्रतिपादन नागेश भोसले यांनी केले.   
 या मॅरेथॉनमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेतील खेळाडू सुयश व्यवहारे, पवन मुसळे, नाताजी खपाले, मारुती जाधव यांनीही सहभाग नोंदवला. 
मॅरेथॉन संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पंढरपुर मर्चंट बॅकेचे चेअरमन नागेश भोसले, आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व पंढरी सायकल मॅरेथॉनचे आयोजक सागर कदम व जिल्हा सायकलींग अशोसिएशनचे सचिव दिपक घंटे यांच्या शुभहस्ते पंढरपुर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल खेळाडुंना सन्मानचिन्ह व पत्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 
यावेळी जिल्हा सायकलींग असोशिएशनचे सदस्य  प्रशांत कांचन-पाटील, सायकलींग प्रशिक्षक महादेव व्यवहारे, अ.भा.छावाचे सतीश माने, गणेश थिटे, विठ्ठल भुमकर, डॉ.शिंगटे, डॉ.भोसले, डॉ.पाटील, डॉ.शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. पंढरी सायकल मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही पंढरपूरकर फांऊडेशनचे सचिव ओंकार चव्हाण, बिपीन देवमारे, गणेश जाधव, निलेश कदम, पिंटु कुंभार,गणेश शिंदे, बाळासाहेब गोडबोले, सत्यम धुमाळ, आकाश पवार इत्यादींनी परिश्रम घेतले. 
 
Top