राजस्थान विधानसभेने बुधवारी (दि.१३) सरकारी नोकरी आणि शिक्षणात गुज्जर आणि अन्य चार समाजांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मंजूर केले. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून गुज्जर समाजाचे नेते किरोरी सिंह बैंसला यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानातील विविध भागात तीव्र आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारने गुज्जर समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मंजूर केले. यामुळे गुज्जर यांच्यासह बंजारा, गाडीया लोहार, राईका/रैबारी आणि गडरिया आदी समाजांना ५ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ५ टक्के आरक्षणामुळे मागासवर्गीयांचा आरक्षण कोटा २१ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. 

गुज्जर समाजाचे नेते किरोरी सिंह बैंसला यांनी या आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.पाच जाती खूप अतिमागास असून त्यांना नोकरी आणि शिक्षणात वेगळे आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.गुज्जरांसह पाच जातींचा अतिमागास प्रवर्गातून एक टक्का आरक्षणाला याआधी राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यानंतर गुज्जर समाजाने आंदोलन मागे घेतले होते. मात्र आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा गुज्जर समाजाने दिला होता. त्यानुसार गुज्जर समाजाने पुन्हा आंदोलन केले.

 
Top