पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी नगरपरिषदेची पुर्व परवानगी न घेता विविध पक्षाने व संघटनांनी लावलेले  अनाधिकृत डिजीटल बोर्ड, बॅनर, पोस्टर्स लावले होते. याबाबत सदरचे अनाधिकृत डिजीटल बोर्ड लावणा-यांवर कारवाई करावी असे पोलीस प्रशासनाने पंढरपूर नगरपरिषदेला कळविले होते. त्यास अनुसरुन पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व नगरअभियंता दिनेश शास्त्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या समवेत संयुक्त बैठक होवुन शहरातील अनाधिकृत डिजीटल बोर्ड काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज जावळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन शहरातील अनाधिकृत बॅनर, बोर्ड, पोस्टर्स काढण्यात  आली. 
सदरच्या अनाधिकृत डिजीटल बोर्ड बाबत काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये व सोशल मिडीयावर बातम्या व्हाईरल झाल्या होत्या. याची दखल घेत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज जावळे , उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली  नगर अभियंता दिनेश शास्त्री, अभियंता नेताजी पवार, अतिक्रमण पथक प्रमुख भिकाजी मगर, नवनाथ पवार, प्रभाकर सरवदे, पांडुरंग लोंढे या पथकाने शहरातील सर्व अनाधिकृत बोर्ड जप्त करुन कारवाई केली.  

यापुढील काळात जर अनाधिकृत डिजीटल बोर्ड, बॅनर, पोस्टर्स लावण्यात आल्यास मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यामधील तरतुदीनुसार संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील तसेच डिजीटल बोर्ड छापणा-या व्यवसायीकांनी देखील डिजीटल बोर्ड, बॅनर, पोस्टर्स छापण्यापुर्वी पंढरपूर नगरपरिषदेची पुर्व परवानगी घेतली असल्याचे पाहुनच डिजीटल बोर्ड छापावेत अशा सुचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच ज्या दुकानामध्ये डिजीटल बोर्ड छापला आहे त्या फर्मचे नाव त्यावर छापणे आवश्यक आहे. असे असताना देखील काही डीजीटल बोर्ड व्यवसायीकांनी फर्मचे नाव त्यावर छापले नाही त्यामुळे संबंधीत डिजीटल बोर्ड व्यवसायीकांनी याची दखल घ्यावी अन्यथा त्यांच्यावरही पुढील काळात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले.

 
Top